वनवास संपला, आता अग्निपरीक्षा !!!



जय श्रीराम !

सध्या श्रीराम मंदिर अयोध्या येथील कथित दान चोरी प्रकरणाने मोठाच जोर धरलेला आहे.

या प्रकरणासंबंधित काही महत्वपूर्ण मुद्दे पाहणे आणि त्यांचा उहापोह करणे आवश्यक आहे.

जेंव्हा ही अनियमितता ट्रस्ट च्या लक्षात आली, (४ जून २०२६) तेंव्हा स्वतः ट्रस्ट ने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचा आग्रह धरला.

ट्रस्ट च्या आग्रहावरूनच विशेष चौकशी समितीचे गठन करण्यात आले.  या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन त्यातील तथ्ये समोर आणावी असाही आग्रह ट्रस्ट करत आहे. अर्थात " कर नाही तर डर कशाला " अश्याच बाण्याने, ट्रस्ट चौकशीचा आग्रह धरत आहे. खरी मेख इथेच आहे, जर ट्रस्टी कथित घोटाळेबाज असते तर हे प्रकरण प्रशासन दरबारी गेलेच नसते. परंतु असे होताना दिसले नाही याचाच अर्थ सदर प्रकरण ट्रस्टींनी संगनमताने किंवा कट कारस्थानाने घडवून आणलेले नाही.

चौकशीला सामोरे जात असताना, पद अधिकार यांचा प्रभाव किंवा दबाव कोणावरही असू नये यासाठी ट्रस्टी मंडळींनी स्वतः आपले राजीनामे सादर केले आहेत.

वास्तवात ज्या माननीय चंपतरायजींवर आरोप केले जात आहेत ते चंपतराय हे त्यांची प्राध्यापकी सोडून ऐन तारुण्यामध्ये श्रीराम मंदिर मुक्ती मंदिराच्या आंदोलनात सहभागी झाले होते. श्री चंपतराय यांच्या एका प्रवासा दरम्यान मी प्रत्यक्ष त्यांच्या सहवासात राहिलो असल्याने त्या माणसाचे संघटना आणि अर्थात श्रीराम मंदिर मुक्ती आंदोलन हेच जिवन राहिले आहे हे मी स्पष्टपणे सांगू शकतो.

आरोपांच्या फैरी मध्ये आणखी एक आरोप लावला जात आहे की; नजूल भूमी खरेदीतील गैरव्यवहार, वास्तवात ही भूमी ट्रस्ट ने खरेदी केली आहे विकलेली नाही. या मध्ये असा प्रश्न केला जात आहे की; कमी किमंतीमध्ये घेतलेली जमीन ही काही वेळातच दसपट भावाने ट्रस्ट ला विकण्यात आली. 

अरे बाबांनो ! जो व्यवहार झाला आहे तो सरकारी नियमानुसार आणि बाजारमूल्ये लक्षात घेऊन झालेला आहे, वास्तवात ज्या भूमीचा वाद आहे ती जमीन सरकारच्या विशेष परवानगी शिवाय विकता येत नाही. तरीही जर सरकारी मूल्यांकन किंवा शुल्क भरणा यांमध्ये अनियमितता असेल तर हे प्रकरण न्यायालयीन मार्गाने आणि शुल्क भरणा करून किंवा आवश्यक परवानगी घेऊन-देऊन निकाली काढता येते. 

या प्रकरणातील आरोपींना ट्रस्टीचे नातेवाईक किंवा कुटुंबीय दाखवण्याचा प्रयत्न हा केविलवाणा तर आहेच परंतु हास्यास्पद देखील आहे. सोमेश आणि चंदन राय हे अनुक्रमे गोपाल जी आणि चंपतराय जी  यांचे पुतणे आहेत हा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी साफ फेटाळला आहे. त्यामुळे या प्रकरणातील हवाच निघून गेली आहे.

असो ! श्रीराम मंदिर उभारणी आणि श्रीरामल्लाची प्रतिष्ठापना  हा समस्त हिंदूंसाठी गौरवाचा, शौर्याचा आणि प्रेरणेचा विषय आहे. त्यामुळे त्या पवित्रतम् वास्तू बद्दल विवादास्पद टिप्पणी करून, हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याचा हा डाव आता उघड होतो आहे. या प्रकरणामध्ये ट्रस्टी वर आरोप करणारे कधी मुक्ती आंदोलनात दिसले का ? श्रीराम मंदिर उभारणीसाठी झिजले का ? श्रीराम मंदिराचा गौरव करताना दिसले का ? अहो ज्यांनी रामाचे अस्तित्व देखील नाकारले त्यांचीच पोसलेली पिलावळ आज आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे.

अर्थात या सगळ्या प्रकारानंतरही हिंदू मात्र श्रीराम मंदिरात येण्याचे कमी करत नाहीये आणि दान देण्याचेही सोडत नाहीये, हीच या विघ्नसंतोषी मानसिकतेला हिंदूंनी दिलेली सणसणीत चपराक आहे.

एकंदरीतच सदर प्रकरण हे अनियमितता या प्रकारात मोडणारे असून त्याला घोटाळा म्हणणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.

तथापि हिंदूंनो ! आपण आपल्या श्रीरामावरची श्रद्धा आणि ट्रस्टी वरचा विश्वास जराही डळमळू द्यायचा नाही.... प्रभू श्रीरामांचा वनवास जरी संपला असला तरी आपणा सर्व भक्तांची आता अग्नी परीक्षा सुरु आहे.... संयम ठेवा, श्रद्धा ठेवा तो श्रीराम सर्वव्यापी आहे आणि तोच आपला शक्ती दाता आहे.

श्रीपाद श्रीकांत रामदासी 


Comments