द्वितीय दुर्गा : ब्रह्मचारिणी ( नवदुर्गा विशेष )
दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलू। देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा ॥ नवरात्रीचा दुसरा दिवस अर्थात दुसरी माळ , दुर्गा देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे. माता ब्रह्मचारीणीचा जन्म पर्वराज हिमावत आणि त्यांची पत्नी मेनवती यांच्या पोटी झाला. पर्वताची कन्या असल्याने त्यांना ' पार्वती ' असे संबोधले जाऊ लागले. बालपणापासूनच त्यांनी नारद मुनींकडून भगवान शिवाच्या अनेक कथा ऐकल्या होत्या. त्या कथांचा प्रभाव पडून , भगवान शिवालाच आपला पती म्हणून प्राप्त करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्या काळात भगवान शिवाने सांसारिक जीवन त्यागून संन्यास स्वीकारला होता आणि ते हिमालयात ध्यानमग्न होऊन राहत होते. पार्वतींनी त्यांच्या निवासस्थानाची देखभाल करण्याचे व्रत स्वीकारले ; त्या जागा स्वच्छ ठेवणे , अन्नाची व्यवस्था करणे आणि फुलांनी सजावट करणे अशी कामे त्या करत असत. त्यासोबतच त्या ध्यान आणि प्रार्थनाही करत असत. सुरुवातीला त्या केवळ फळे आणि फुले खाऊन अल्पाहारावर राहत असत , परंतु कालांतराने त्यांनी केवळ पालापाचोळा खाऊन राहण्यास सुरुवात केली. अखेरीस , त्यांनी अन्न आणि पा...