पहिली दुर्गा : शैलपुत्री (नवदुर्गा विशेष )

 


समस्त वाचक, हिंदू माता भगिनी आणि बांधवांना शारदीय नवरात्रउत्सवाच्या अनेक शुभेच्छा !

हिंदू संस्कृतीत सण-उत्सवांना विशेष स्थान आहे, पण त्या सर्वांमध्ये आद्यशक्ती जगदंबेचा महिमा गाणारा आणि भक्तांच्या मनात चैतन्य फुलवणारा सर्वात मोठा उत्सव म्हणजे 'शारदीय नवरात्र'. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा हा नऊ दिवसांचा नऊ रात्रींचा सोहळा म्हणजे केवळ धार्मिक पूजा अर्चा नसून, आपल्यातील वाईट प्रवृत्तींवर चांगल्या वृत्तींचा विजय मिळवण्याचा आणि नवचैतन्याचा उत्सव आहे.

नवरात्रीच्या या नऊ दिवसांत देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची (नवदुर्गा) पूजा केली जाते, त्या  नवदुर्गांचे स्मरण तसेच त्या बद्दल माहिती सांगणारी लेख माला आम्ही सादर करत आहोत.


नवदुर्गातील पहिली मानले गेलेले दुर्गेचे रूप म्हणजे " माता शैलपुत्री " होय.




वन्दे वाञ्च्छितलाभय चन्द्रार्ध कृतशेखरम् ।

वृषारूढाम् शूलधारम् शैलपुत्रीम् यशस्विनीम् ॥

 

पौराणिक कथेनुसार, शैलपुत्री हा भगवान शंकराची पत्नी " माता सती " यांचा पुनर्जन्म होय.

कथा सतीची :

राजा दक्ष यांची कन्या सती हिने, आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन भगवान शंकरांशी विवाह केला.

पुढे जाऊन कालांतराने, राजा दक्ष ने एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले, त्याने विविध राजे, महाराजे आणि देवतांना यज्ञाचे आमंत्रण दिले,

परंतु भगवान शंकरांना आमंत्रण दिले नाही. आपल्या माहेरी महायज्ञ असून आपल्याला त्याचे आमंत्रण नाही याचे सतीला दुःख झाले.

परंतु माहेरच्या ओढीने तिने आमंत्रण नसतानाही यज्ञामध्ये सहभागी होण्याचे ठरवले.

भगवान शंकरांनी आमंत्रण नसताना एखाद्या ठिकाणी जाणे उचित नाही असे समजावून सांगितले. परंतु माता सती मात्र आपल्या हट्टावर ठाम राहिल्या.

अखेर स्त्रीहट्ट मान्य करून, भगवान शंकरांनी जाण्याची परवानगी दिली. माहेरच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सती अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने

आपल्या पित्याच्या घरी आली. तिच्या मातेने तिचे हसतमुखाने स्वागत केले परंतु सतीच्या बहिणी आणि पिता मात्र नाराज झाले. सतीच्या बहिणींनी तिचा उपहास केला तर पित्याने भगवान शंकरांबद्दल अपमानास्पद भाष्य केले. आपल्या पेक्षा आपल्या पतीची होणारी अवहेलना सतीला जिव्हारी लागली आणि अश्याच मनोवस्थेत माता सतीने यज्ञकुंडात स्वतः ला समर्पित केले.

 

कालांतराने माता सतीने पर्वतराज हिमालय किंवा हिमावत याच्या घरी जन्म घेतला, पर्वताची कन्या म्हणून तिला शैल (पर्वत) पुत्री (कन्या ) अर्थात शैलपुत्री असे संबोधले जाऊ लागले.

माता शैलपुत्रीचे स्वरूप :

माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहेत. कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्य प्राण्यांची रक्षक देखील आहे.

शैलपुत्री मातेच्या उजव्या हातातील त्रिशूळ आहे. जे धर्म, अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे. डाव्या हातात उमललेले कमळाचे फूल आहे.

मातेच्या कपाळावर चंद्रकोर आहे. मातेच्या अंगांवर हलक्या रंगाचे अलंकार आहेत आणि तिने लाल/गुलाबी वस्त्रे परिधान केली आहेत.

माता शैलपुत्रीचे मंदिर :

काशी नगरी वाराणसी येथे माता शैलपुत्रीचे एक अतिप्राचीन मंदिर आहे, त्याबद्दल असे मानले जाते की माता शैलपुत्रीचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.

नवरात्रीच्या पाहिल्यादिवशी म्हणजेच ज्याला घटस्थापना असेही म्हणतात, त्या दिवशी माता शैलपुत्रीचे आवाहन, प्रार्थना तथा पूजन केल्याने कौटुंबिक जीवनातील सर्व संकटांचे निराकरण होते अशी देखील मान्यता आहे.

 

॥ ॐ देवी शैलपुत्र्यै नमः ॥


Comments