द्वितीय दुर्गा : ब्रह्मचारिणी ( नवदुर्गा विशेष )
दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि
ब्रह्मचारिण्यनुत्तमा ॥
नवरात्रीचा दुसरा दिवस
अर्थात दुसरी माळ, दुर्गा देवीचे द्वितीय
स्वरुप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे.
माता ब्रह्मचारीणीचा
जन्म पर्वराज हिमावत आणि त्यांची पत्नी मेनवती यांच्या पोटी झाला. पर्वताची कन्या
असल्याने त्यांना 'पार्वती' असे संबोधले जाऊ लागले.
बालपणापासूनच त्यांनी नारद मुनींकडून भगवान शिवाच्या अनेक कथा ऐकल्या होत्या. त्या
कथांचा प्रभाव पडून, भगवान शिवालाच आपला
पती म्हणून प्राप्त करण्याचा त्यांनी निश्चय केला.
त्या काळात भगवान
शिवाने सांसारिक जीवन त्यागून संन्यास स्वीकारला होता आणि ते हिमालयात ध्यानमग्न
होऊन राहत होते.
पार्वतींनी त्यांच्या
निवासस्थानाची देखभाल करण्याचे व्रत स्वीकारले; त्या जागा स्वच्छ ठेवणे, अन्नाची व्यवस्था करणे
आणि फुलांनी सजावट करणे अशी कामे त्या करत असत. त्यासोबतच त्या ध्यान आणि
प्रार्थनाही करत असत. सुरुवातीला त्या केवळ फळे आणि फुले खाऊन अल्पाहारावर राहत
असत, परंतु कालांतराने
त्यांनी केवळ पालापाचोळा खाऊन राहण्यास सुरुवात केली. अखेरीस, त्यांनी अन्न आणि पाणी पूर्णपणे
त्यागले यामुळेच त्यांना अपर्णा असेही संबोधले जाते.
अशा प्रकारे हजार
वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर, एक वृद्ध व्यक्ती
त्यांना भेटायला आली. त्या वृद्ध व्यक्तीने भगवान शिवाला 'भिकारी' (भिक्षुक) म्हणून
हिणवले. ती अपमानास्पद भाषा ऐकून पार्वतींना राग आला. त्यांची भक्ती आणि दृढनिश्चय पाहून ती वृद्ध
व्यक्ती जी प्रत्यक्षात वेषांतर केलेले भगवान शिवच होते आपल्या मूळ रूपात प्रकट
झाली आणि त्यांनी पार्वतींशी विवाह करण्यास संमती दिली.
आणखी एका कथेनुसार :
अनेक वर्षे कठोर
तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते. तिची ही अवस्था पाहून तिची आई
मेना खूप दु:खी झाली होती. तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी 'उमा' अगं! नको ग नको! अशी हाक दिली. तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या
पूर्वजन्माचे 'उमा' हे एक नाव पडले.
तिची ही तपस्या पाहून
त्रिलोकात हाहाकार उडाला. सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी
ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले, की 'हे देवी! आजपर्यंत
इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही. तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे.
तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील. आता
तू तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील.' असा वर त्यांनी दिला.
ब्रह्मचारिणी या
शब्दामध्ये 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे.
ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी.
वैदिक ग्रंथांमध्ये ब्रह्मचारिणी या शब्दाचा अर्थ पवित्र धार्मिक ज्ञानाचा
शोध घेणारी स्त्री असाही सांगितला गेला आहे.
माता ब्रह्मचारिणीचे स्वरुप :
देवीचे हे रूप अत्यंत
साधे आणि सात्त्विक आहे. साधी पांढरी साडी परिधान केलेल्या देवीच्या एका हातात
कमंडलू आहे, तर दुसऱ्या हातात
जपमाळ आहे.
हे देवी पार्वतीचे
अविवाहित / कुमारिका रूप आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वात एक ध्यानस्थ भाव दिसून येतो; तिच्या चेहऱ्यावर परमानंद आणि शांत
सामर्थ्य झळकते, जे तिने केलेल्या कठोर
तपस्येची साक्ष देते.
माता ब्रम्हचारीणीचे मंदिर :
काशी वाराणसी येथील
दुर्गा घाटावर माता ब्रह्मचारीणीचे प्राचीन मंदिर आहे. काशीपुरीस भेट देणारे भाविक
आवर्जून या मंदिरास भेट देतात.
।। ॐ देवी ब्रह्मचारिण्यै नमः ।।

Comments