तिसरी दुर्गा : माता चंद्रघंटा [ नवदुर्गा विशेष ]

 



पिण्डज प्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकैर्युता।

प्रसादं तनुते मह्यं चंद्रघंटेति विश्रुता॥

 

नवदुर्गामधील मातेचे तिसरे रूप म्हणजे " चंद्रघंटा " होय. देवी चंद्रघंटा ही चंद्राचे प्रतीक आहे, ज्याचा संबंध मनाशी असतो. मनाला मोहून टाकणाऱ्या आणि आकर्षित करणाऱ्या शक्तीचे त्या प्रतिनिधित्व करतात. त्या सौंदर्याचे मूर्तिमंत रूप आहेत. तुम्हाला जिथे कुठे काहीही सुंदर दिसते, ते त्या ठिकाणी असलेल्या देवीच्या ऊर्जेमुळेच असते. जर ती तिथे नसेल, तर कोणतीही गोष्ट सुंदर वाटणार नाही. [ गुरुदेव श्री श्री रविशंकर ]

माता चंद्रघंटा बाबत कथा :

माता पार्वती देवीने भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती हे आपण मागील लेखांकामधून पहिलेच आहे.

त्यावेळी, आपली पहिली पत्नी सती हिच्या वियोगामुळे दुःखी झालेले शिव पर्वतांवर एकांतात वास्तव्यास होते. अत्यंत दुःखात असूनही, पार्वतीची अढळ भक्ती पाहून शिव प्रभावित झाले आणि त्यांनी तिच्याशी विवाह करण्यास संमती दिली. पार्वती हा सतीचाच पुनर्जन्म होता हे देखील आपण पहिल्या लेखांकामध्ये पहिले आहे.

पार्वतीला दिलेल्या वचनानुसार भगवान शिव पार्वतीच्या घरी विवाहासाठी आले.

आपल्या नित्य राहणीमानानुसार शिवांचे रूप रौद्र होते. भगवान शिवाने अंगाला राख फासलेली होती, जटाधारी, आणि गळ्यात कवटीची व सापांची माळ घातली होती.

त्यांच्या सोबत त्यांचे उग्र गण तसेच भूत-प्रेत आणि अघोरींचा यांचा समूह वऱ्हाड म्हणून आले होते. त्यांचा तो भयावह वरात समूह पाहून पार्वतीचे कुटुंबीय व मित्र-परिवार भयभीत झाले.

रौद्र शिवाला साजेल असे दिसण्याकरता आणि आपल्या प्रियजनांचे रक्षण करण्यासाठी, पार्वतीने तितकेच उग्र रूप धारण केले, त्याच रुपाला 'चंद्रघंटा' असे संबोधले जाते.

दोन्ही देवतांची उग्रता लक्षात घेता, अखेर माता पार्वतीने भगवान शिव यांना अधिक सौम्य व प्रसन्न रूप धारण करण्याची विनंती केली.

भगवान शिवाने ती विनंती मान्य केली आणि रत्नांनी सुशोभित अशा राजपुत्राचे रूप धारण केले. त्यांच्या या राजस रूपास पाहून माता पार्वतीचे कुटुंबीय व मित्र-परिवाराला धीर दिला; त्यानंतर त्यांनी मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा साजरा केला.

याच अलौकिक विवाह सोहळ्याची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव म्हणजेच " शिवरात्री " होय.

माता चंद्रघंटाचे स्वरूप :

चंद्रघंटा देवीचे दहा हात आहेत जिथे दोन हातात त्रिशूल, तर एक-एक हातात गदा, धनुष्य-बाण, खडक , कमळ, घंटा आणि कमंडलू आहेत.

तिचा एक हात आशिर्वाद मुद्रा किंवा अभयमुद्रा आहे. ती तिचे वाहन म्हणून वाघ किंवा लांडग्यावर स्वार होते, जे शौर्य आणि धैर्याचे प्रतीक आहे.

मातेच्या कपाळावर घंटा दर्शविणारा अर्धचंद्र असून, कपाळाच्या मध्यभागी तिसरा डोळा आहे. तिचे रुपरंग सोनेरी आहे.

माता चंद्राघंटेची शस्त्रसज्जता ही दुष्टांचा नाश करण्याची सज्जता दर्शवते तर, अभयमुद्रा असणारा हात, भक्तांवरच्या कृपा दृष्टीला व्यक्त करते.

माता चंद्रघंटा मंदिर :

माता चंद्राघंटाचे मंदिर हे काशी वाराणसी येथे आहे.

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते. चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते. चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते. देवीच्या पूजनाने मन नियंत्रणात ठेवता येते. जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन, आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक बनते. चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतीकच मानता येईल.

 

।। ॐ देवी चंद्रघण्टायै नम: ।।



Comments